
कळमसरेचे सुपुत्र सुधाकर चौधरी सुरतचे उपमहापौर; गावात जल्लोष
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी तथा सुरत येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सुधाकर लोटन चौधरी यांची सुरत महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कळमसरे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावात जल्लोष साजरा करण्यात आला.
सुधाकर चौधरी हे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून सुरत महानगरपालिकेत बहुमताने निवडून येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य, सामाजिक व नागरी समस्यांवर सातत्याने काम करत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. सलग तीन वेळा निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला असून त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर उपमहापौरपदाची जबाबदारी सोपविली आहे. कळमसरे येथून रोजगार व व्यवसायानिमित्त ते सुरत येथे स्थायिक झाले असले तरी त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून तेथील समाजजीवनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरत शहरात ते गेल्या वीस वर्षांपासून माळी समाजाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून विविध समाजांतील सामूहिक विवाह सोहळ्यांचे स्वखर्चाने आयोजन करून त्यांनी सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर राहत असल्याने त्यांना नागरिकांचे मोठे समर्थन लाभले आहे. त्यांच्या उपमहापौरपदी निवडीची बातमी समजताच कळमसरे गावातील माळी समाज बांधव, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. खान्देशातील कळमसरे गावाचे नाव सुरतसारख्या महानगरात उज्ज्वल केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माळी समाज पंच मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विकास सोसायटीचे पदाधिकारी तसेच विविध समाजातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply