ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय गुणवत्तेचे मानांकन

अमळनेर (प्रतिनिधी) ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्यसेवा, स्वच्छता, रुग्णसेवा, औषधोपचार, उपलब्ध सुविधा तसेच विविध आरोग्यविषयक निकषांची प्रभावीपणे पूर्तता केल्याने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके अंतर्गत राज्यस्तरीय मानांकन मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन बापूराव पाटील, आरोग्य सहाय्यक उदयराज कुणबी तसेच सर्व कर्मचारीवृंद यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वयाने काम केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव राज्यस्तरावर पोहोचले आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांच्या मानांकनासाठी आरोग्य केंद्रातील विविध सेवा, रुग्णांच्या सुविधा, स्वच्छता, औषधांचा साठा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, अभिलेख व दस्तऐवजीकरण, रुग्णांच्या हक्कांचे पालन आणि एकूणच आरोग्यसेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाते. या सर्व बाबींमध्ये ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली. या यशामागे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी व डॉ. संजय रनालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्याने हे यश प्राप्त झाले. ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेले राज्यस्तरीय राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांचे मानांकन हे संपूर्ण आरोग्य विभागासाठी अभिमानाची बाब असून, या यशाबद्दल वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवृंदाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *