
१५ जूनपूर्वी हयात प्रमाणपत्र जमा करा; अन्यथा निवृत्ती वेतन बंद होण्याची शक्यता
अमळनेर (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय, अमळनेर यांच्या मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध निवृत्ती वेतन योजनांतील लाभार्थ्यांना डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थ्यांनी दि. १५ जून २०२६ पूर्वी हयात प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना तसेच राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी पात्र लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध असल्यास त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून “बेनेफिसिअरी सत्यपान अँप्लिकेशन ” व “आधार फेस आर डी” हे ॲप डाउनलोड करून स्वतःचे अथवा नातेवाईकांचे मोफत डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच लाभार्थ्यांनी स्वतः किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
शासनाने हयात प्रमाणपत्रासाठी ५० रुपये इतकी फी निश्चित केली असून त्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्यास संबंधित सेतू केंद्रावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच कोणत्याही गैरअधिकृत व्यक्तीकडून अधिक रक्कम आकारल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दि. १५ जून २०२६ पूर्वी लाभार्थ्यांनी काढलेले हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालय किंवा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील अनुदानाची ऑनलाइन प्रक्रिया बंद होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. काही अडचण असल्यास ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), महसूल सेवक (कोतवाल) किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

Leave a Reply