अमळनेरमध्ये गांजा सेवनाविरोधात पोलिसांची संयुक्त कारवाई; चार तरुण रंगेहाथ पकडले

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात येणाऱ्या गांजावर बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घातला असला तरी काही तरुण गांजा सेवन करून व्यसनाधीन होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गांजा सेवन करणाऱ्या चार तरुणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तरुण गांजा सेवनाकडे वळत असल्याने भविष्यात गुन्हेगारी वाढू शकते, या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राहुल गायकवाड व अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संयुक्त मोहीम राबवली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ११ रोजी विविध पथके तयार करून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.

मारवड रस्त्यावर उड्डाणपुलाखाली राजेश चुडामन कोईकर (वय २१, रा. बंगाली फाईल) हा तरुण चिलीममध्ये गांजा भरून सेवन करताना आढळून आला. तसेच इंदिरा भवनच्या मागील मोकळ्या जागेत आदिल आबीद शेख (वय २५, रा. माळीवाडा, बहादरपूर रोड) गांजा सेवन करताना पकडण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत रेल्वे स्टेशनबाहेरील पाण्याच्या टाकीजवळ निलेश महेंद्र पाटील (वय २२, रा. बंगाली फाईल) हा चिलीममध्ये गांजा सेवन करताना आढळून आला. तर इंदिरा भवनच्या मागील बाजूस नईमअली अशपाक अली (वय २५, रा. गांधलीपुरा) हा देखील गांजा सेवन करताना पकडण्यात आला.

चारही तरुणांकडून चिलीम व गांजा जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे गांजा सेवन करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान शेतकी संघ जीन परिसर, बसस्थानकाच्या मागील भाग, अंबाऋषी टेकडी, चोपडा रोड उड्डाणपूल, दाजीबा नगरजवळील मैदान आदी ठिकाणीही काही तरुण गांजा सेवन करत असल्याची तक्रार असून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ही कारवाई एलसीबी निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण मांडोळे, संदीप पाटील तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, नितीन मनोरे, उदय बोरसे, निलेश मोरे, उज्वल कुमार म्हस्के, नितीन कापडणे यांनी केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *