
अमळनेरमध्ये ‘स्व-गणना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; लोकप्रतिनिधींसह नागरिकांना सहभागाचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी ) भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत सुरू झालेल्या ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) उपक्रमाला अमळनेर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, तसेच अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः ऑनलाइन नोंदणी करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.या उपक्रमाचा शुभारंभ मा. आमदार अनिल पाटील आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांनी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरून ‘SE ID’ प्राप्त केला.‘आमची जनगणना, आमचा विकास’ या संकल्पनेखाली प्रथमच नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकावरून माहिती नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, शहराच्या पुढील दहा वर्षांच्या विकासाचे नियोजन, पायाभूत सुविधा आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही जनगणनेतील अचूक आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने १५ मेपूर्वी आपली स्व-गणना पूर्ण करावी.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणारा ‘SE ID’ सुरक्षित ठेवावा. १६ मे ते १४ जून या कालावधीत नगरपरिषदेचे प्रगणक घरोघरी सर्वेक्षणासाठी येतील, तेव्हा हा ‘SE ID’ देऊन सर्वेक्षण प्रक्रिया अधिक जलद करता येईल.
अमळनेर शहराची १०० टक्के अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply