जिनियस मॅथेमॅटिक्स परीक्षेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची उत्तुंग भरारी

अमळनेर (प्रतिनिधी)  नमो शैक्षणिक फाउंडेशन संचलित ‘जिनियस मॅथेमॅटिक्स’ परीक्षेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले आहे. गणित विषयावर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक क्षमता, अचूकता आणि चातुर्य सिद्ध करत शाळेचा नावलौकिक वाढवला.

या परीक्षेचे आयोजन पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. गणितीय सूत्रे, अंकीय गणित तसेच विविध प्रकारच्या प्रश्नसंचांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विश्लेषणात्मक क्षमतेची कसोटी पाहणारी ही परीक्षा ठरली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली प्रतिभा दाखवून दिली. जिल्हास्तरावर नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता तिसरीतील विवान महेश लोढा याने विशेष यश मिळवत रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्राप्त केले. तसेच विद्यालयीन स्तरावर देशना वर्धमान जैन (इयत्ता तिसरी) आणि हम्माद मोहसीन खानपठाण (इयत्ता चौथी) यांनीही यश संपादन करत स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र मिळविले. या यशामागे शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, विद्या कुलकर्णी, योगिता पाटील, स्वाती माळी, व्ही. जी. बोरोले, प्रशांत वंजारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही अशाच स्पर्धांमध्ये यश संपादन करण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *