जळगाव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची १७ सप्टेंबर रोजी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात जळगाव जिल्ह्याचा कोरडा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांचे अनुदान मंजूर करावे, वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, महावितरणकडून शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांना त्वरित नवीन वीज जोडणी द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी वाढत असून, शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ईश्वर उखा पाटील, देवेंद्र वराडे, दिलीप चौधरी, अतुल पाटील, प्रमोद पाटील, भूषण कोळी, योगेश कोळी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *