श्री मंगळग्रह मंदिरात श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळा

श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायणात 459 भक्तांचा सहभाग

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी-श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळा झाला. याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल दहा तास चाललेल्या या कार्यक्रमाने मंदिर परिसरात भक्ती आणि सकारात्मक उर्जेची मंगलमय अनुभूती असंख्य भक्तांना आल्याचे पाहावयास मिळाले.

सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात ठिकठिकाणच्या शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवला. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक साधनेचा अनोखा अनुभव घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी वेदमंत्रांच्या गजरात व श्री सिद्धिविनायक गणेशजी, मंगळेश्वर श्री पंचमुखी हनुमानजी, मंगळेश्वरी श्री भूमी माता व श्री मंगळग्रह देवतेच्या आरतीने झाला. यावेळी गणेश पूजनासह विविध देवतांना आवाहन करण्यात आले. वेदमंत्रांच्या गजरात आणि दत्त नामाचा जयघोष करण्यात आला. अमळनेर व चोपडा येथील महिला अनुक्रमे जया पाटील व भारती भदाणे तसेच पुरुष भक्त सोनू पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन सुरू झाले. याप्रसंगी लहानग्यांनीही एकाग्र होऊन पारायणाची अनुभूती घेतली. श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सकाळी साबूदाणे, खोबरा-मावाबर्फी, केळी व चहा देण्यात आला. तसेच समारोपानंतर वरण, भात, बेंगनफ्राय, मटकी रश्श्याची उसळ, पुरी, गावरान तुपातील केशर जिलेबी, पापड, सलाद या महाप्रसादाचा सर्व भक्तांनी आस्वाद घेतला. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी सामूहिक पारायण सोहळा यशस्वितेसाठी बहुमोल श्रम घेतले.

 

नियोजनबद्ध वाचन

 

श्री गुरुचरित्राच्या संपूर्ण ग्रंथाचे नियोजनबद्ध अध्यायवार वाचन करण्यात आले. तसेच श्री गुरुचरित्रातील आदर्श जीवनमूल्ये आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहेत, असे संबंधितांकडून ओघवत्या शैलीत व सहज-सुंदर शब्दांत सांगण्यात आले.

 

आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव

 

सामूहिक पारायणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनःशांती लाभते, अशी भावना उपस्थित भक्तांनी याप्रसंगी व्यक्त केली. श्री गुरुचरित्र वाचनातून संयम, श्रद्धा आणि सदाचार यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, अशी प्रतिक्रियाही यावेळी भक्तांनी व्यक्त केली.

 

चोपड्यातील भक्तांसाठी बस व्यवस्था

 

श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायणासाठी अमळनेरसह धुळे, शिंदखेडा, चोपडा, शिरपूर, बोराडी, पारोळा, पाचोरा यासह विविध ठिकाणांहून भक्तांची सहभाग नोफ्लदविला होता. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अमळनेर येथील आगारप्रमुख श्री. प्रमोद चौधरी यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या विनंतीला मान देऊन तत्काळ श्री मंगळग्रह मंदिरापासून बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भाविकांना बसस्थानकावर जावे लागले नाही. परिणामी त्यांची गैरसोय टळली. या सामाजिक जाणिवेचे भान ठेवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आगारप्रमुख तसेच बसवाहक व चालक आर. आर. सोनार व किरण पारधी यांचे आभार मानले आहेत.

 

मंगलमय ‌‘9‌’ ची प्रचिती!

 

पारायणाला 459 स्त्री-पुरुष भाविक बसले होते. श्री मंगळग्रहाचा शुभांक ‌‘9‌’ आहे. 459 या अंकाची बेरीजही ‌‘9‌’ येते. मंदिरात झालेल्या पहिल्याच पारायणाला जणू साक्षात श्री मंगल देवतेने ‌‘9‌’ च्या माध्यमातून प्रचिती दिल्याचे सर्वांनी अनुभवले. आता दरवर्षी हे पारायण नियमित होणार आहे. तसेच चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशतीचे पाठ व्हावेत, अशी इच्छा उपस्थित अनेक भाविकांनी व्यक्त केली. मंगळग्रह सेवा संस्थेने या इच्छेचा आदर राखत हा देखील कार्यक्रम नक्की करू, असे आश्वासन दिले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *