जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची धार येथे कृषी पंढरीची वारी; ‘शेतकरी माझा पांडुरंग’ उपक्रमाला प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत अमळनेर तालुक्यातील धार येथे आयोजित “शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी” या अभिनव उपक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहायक कृषी अधिकारी फेसबुक पेज टीम आणि तिफन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन माती हातात घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि “घेऊन हाती मूठभर माती, करूया शेतीची वारी” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून मूर्त रूप दिले.

यावेळी रोहन घुगे यांनी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अर्थव्यवस्थेचे अधिष्ठान असल्याचे सांगितले. शेतकरी हा खऱ्या अर्थाने अन्नदाता असून त्याच्या कष्टाचा समाजाने सन्मान केला पाहिजे, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. आषाढी वारीच्या भक्तिमय परंपरेला कृषी संस्कृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमातून शेती, माती आणि शेतकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत शाश्वत शेती, माती संवर्धन आणि कृषी जनजागृतीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. “शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी” या उपक्रमामुळे आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश आणि कृषी संस्कृतीचा गौरव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या या कृषी पंढरीच्या वारीमुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी आणि कृषी उपसंचालक भरत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत कृतज्ञता अभियानाला यशस्वी करण्यासाठी सक्रिय योगदान दिले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *