दोन वर्षे उलटली तरी ढेकू रोडचे काम ठप्प; २.३२ कोटींच्या काँक्रिटीकरणाला मुहूर्त नाही !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या जांभोरा–मांडळ प्रमुख जिल्हा मार्गावरील ढेकू रोडच्या काँक्रिटीकरणासाठी दोन वर्षांपूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आला असतानाही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ मार्च २०२४ रोजी २ कोटी ३२ लाख ३५ हजार २२० रुपयांच्या खर्चाच्या कामाचा आदेश श्रेया कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला दिला होता. मात्र दोन वर्षे उलटूनही कामाला मुहूर्त न लागल्याने सुमारे दहा हजार नागरिकांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागत आहे.

ढेकू रोड परिसरात सुमारे १६ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून भुयारी गटार योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. सुमारे पाच महिने रस्ता पूर्णतः बंद ठेवून हे काम अतिशय संथगतीने करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्यात आल्याने नागरिकांना मागील पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागला.

यानंतर रस्त्यावर एमपीएमचे निकृष्ट काम करण्यात आल्याने काही दिवसांतच खडी निघू लागली आणि ठिकठिकाणी खड्डे पडले. परिणामी वाहनचालकांना रोज अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून किरकोळ अपघात घडत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होणे, धुळीचा त्रास तसेच पाठीचे आजार वाढण्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. पायी चालणाऱ्या आबालवृद्धांनाही या रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून दोन वर्षांत या विषयावर पाठवलेले हे एकमेव पत्र असल्याची बाबही लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराला अभय दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

सदर पत्रात नमूद केलेले भुयारी गटार योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आले असून ते अंदाजपत्रकाप्रमाणे सुमारे १६ महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता आर. डी. सूर्यवंशी यांनी दिली आहे.

हा रस्ता शहरातील प्रमुख मार्ग असून यावरून दहा ते बारा गावांची नियमित वाहतूक होते. तसेच धुळे जिल्ह्याकडून येणारी अनेक वाहनेही याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

दरम्यान, या कामासाठी ठेकेदाराला देण्यात आलेला बारा महिन्यांचा कालावधीही संपून गेला आहे. त्यामुळे ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच येत्या १० ते १५ दिवसांत कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र प्राप्त

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे २६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे पत्र नगरपालिकेला प्राप्त झाले आहे. त्यात नमूद भुयारी गटार योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुमारे १६ महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे. सध्या शहरात २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून ढेकू रोडवरील पाइपलाइन क्रॉसिंगचे काम त्वरित करून रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्यास मदत केली जाईल.

गणेश शिंदे, नगरपरिषद मुख्याधिकारी

 

कामाबाबत पालिकेशी पत्रव्यवहार

 

कार्यालयाचा कार्यभार नुकताच स्वीकारला असून या कामाबाबत पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील. तसेच काम सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पिंपळे व गलवाडे रोडमार्गे वळवण्याचे नियोजन करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.

पी. ए. पाटील, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *