व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये कृतीयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवले गणिताचे वैश्विक महत्त्व

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे ‘पाय डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. कृतीयुक्त उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना गणितातील पाय (π) या अपरिमेय संख्येचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आले. या वेळी “गणित शिकवण्यापेक्षा गणित अनुभवू द्या” असा संदेश देत अमळनेर तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर यांनी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मार्गदर्शन करताना डी. ए. धनगर यांनी दैनंदिन जीवनातील घड्याळ, सायकल, मोटारसायकल, ताट, मोबाईल, दूरचित्रवाणी, विमान यांसारख्या असंख्य वस्तूंमध्ये वर्तुळाचा उपयोग होत असल्याचे सांगितले. प्रत्येक वर्तुळाच्या केंद्रस्थानी पाय (π) ही संख्या असून, हजारो वर्षांपासून तिने गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना आकर्षित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतात दरवर्षी बावीस जुलै हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो. कारण बावीस भागिले सात हे मूल्य पायच्या सन्निकट मूल्याच्या अत्यंत जवळ आहे. जगभरात चौदा मार्च रोजी ‘पाय डे’ साजरा केला जात असला, तरी भारतीय शालेय गणितात बावीस भागिले सात या मूल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे बावीस जुलै या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध वर्तुळाकार वस्तूंचा परिघ आणि व्यास प्रत्यक्ष मोजून त्यांचे गुणोत्तर काढले. कोणत्याही वर्तुळाचा परिघ व्यासाने भागल्यास जवळपास समान उत्तर मिळते, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आत्मविश्वास निर्माण झाला. या उपक्रमासाठी मंगल जाधव, योगिता देशमुख आणि प्रशांत निकम यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डी. ए. धनगर यांनी पाय ही अपरिमेय संख्या असल्याने तिच्या दशांशानंतरचे अंक कधीही संपत नाहीत आणि त्यांची पुनरावृत्तीही होत नसल्याचे सांगितले. आज महासंगणकांच्या साहाय्याने पायचे लाखो कोटी अंक शोधण्यात आले असले तरी त्याचा शेवट अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे व्यवहारात त्याचे सन्निकट मूल्य वापरले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाण्याच्या टाक्या, विहिरी, धरणे, पूल, बोगदे, वाहनांची चाके, रेल्वेची चाके, क्रिकेटचा चेंडू, घड्याळे, मोबाईल, संगणक, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय उपकरणे, उपग्रह, रॉकेट आणि अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये पाय या संख्येचा महत्त्वपूर्ण उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पाय डे’ हा केवळ दिनविशेष नसून गणिताशी मैत्री करण्याचा दिवस आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये अनुभवाधारित शिक्षण, तर्कशक्ती, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेवर भर देण्यात आला आहे. त्या उद्दिष्टांना अनुसरून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे शालेय समितीच्या अध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी तसेच सर्व शालेय समिती सदस्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता बोरसे, अरुण पाटील, राहुल लांडगे तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *