
४० लाखांच्या भाडे थकबाकीपोटी पालिकेची कारवाई; अमळनेरातील चार शाळांना सील
अमळनेर (प्रतिनिधी) : सुमारे ४० लाख रुपयांच्या भाडे थकबाकीपोटी अमळनेर नगरपरिषदेकडून चार शाळांवर सील लावण्याची कारवाई रविवारी करण्यात आली. मार्च अखेर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून थकबाकीदारांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालिकेकडून पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापणे तसेच मालमत्ता कर व भाडे थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम सुरू आहे. २२ मार्च रोजी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत व्यवस्थापक लौकिक समशेर, वरिष्ठ लिपिक विजय बागुल, राजू वानखेडे व मनोज सोनार यांच्या पथकाने मुंदडा इंग्लिश मिडीयम स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर तांबेपुरा, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल व अनिल अंबर उर्दू शाळा क्रमांक ११ या शाळांच्या प्रवेशद्वारावर सील लावले. दरम्यान, मार्च महिना सुरू असून विद्यार्थ्यांच्या शालेय परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अशा वेळी शाळांना सील लावल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच शिक्षकांची उपस्थिती, अध्यापन कार्य, वेतन व आयकर आदी प्रशासकीय बाबींवरही परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
नागरिकांनी त्वरित थकबाकी भरावी
सुट्यांच्या दिवशी सुद्धा वसुली आणि कर भरणा सुरू आहे. नागरिकांनी त्वरित थकबाकी भरावी अन्यथा जप्ती, सील लावणे, कुलूप लावणे आदी प्रकारची कारवाई केली जाईल.
– गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद.

Leave a Reply