पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत प्रतापमध्ये विद्यार्थ्यांनी साकारले आकर्षक आकाशकंदील!

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप हायस्कूलमध्ये दिवाळीचे औचित्य साधून पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विविध आकर्षक आकाशकंदील तयार केले. पर्यावरण संवर्धन, कलात्मकता आणि स्वावलंबनाची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला.

शाळेचे चेअरमन सीए नीरज अग्रवाल व मुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यशाळेच्या प्रारंभी शाळेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना आकाशकंदील निर्मितीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शाळेचे कला शिक्षक डी. एन. पालवे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विविध रंगांचे आणि आकर्षक रचनेचे आकाशकंदील साकारले. या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम अशा सर्व धर्मांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत कलानिर्मितीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षक निखिल पाटील, सचिन अहिरे, कृष्णा कोळी, सुहास खांजोडककर, जयश्री पाटील, नम्रता दोरकर तसेच लिपिक सागर पवार आणि शिपाई प्रसाद गोसावी यांनीही स्वतः आकाशकंदील तयार करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सर्व आकाशकंदील दिवाळीनिमित्त शाळेच्या परिसरात लावण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेल्या कलाकृतींनी शाळेचा परिसर उजळून निघाला. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली. फटाके व पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या बाबी टाळून निसर्गपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कला, पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक सलोखा यांचा सुंदर संगम घडविणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *