
मार्केटच्या राजा’च्या दरबारात सजीव देखाव्यातून महाराष्ट्राच्या लोकधारेचा जागर
अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाच्या ‘मार्केटच्या राजा’चा यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर घडविणारा ठरत आहे. बदलत्या काळात लुप्त होत चाललेल्या पारंपरिक लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक उत्सव नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने मंडळाने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित सजीव देखावा साकारला आहे.
वासुदेव, लावणी, वाघ्या-मुरळी, गोंधळ, कानुबाई आणि पोतराज यांसारख्या महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी जोडलेल्या परंपरांचे प्रभावी सादरीकरण या देखाव्यात करण्यात आले असून, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथाही साकारण्यात आली आहे. पारंपरिक वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना आणि ध्वनी यांच्या सुरेख मिलाफातून साकारलेला हा देखावा पाहताना गणेशभक्तांना महाराष्ट्राच्या गावागावातील लोकजीवनाची अनुभूती मिळत आहे. आधुनिक मनोरंजनाच्या काळात मागे पडत चाललेल्या लोककलांचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जोडण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. विशेषतः लहान मुले आणि तरुणांना पारंपरिक कलांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी हा देखावा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या देखाव्याची संकल्पना मोहिनी जोशी यांची असून, दिग्दर्शन मयूर बारसकर यांनी केले आहे. रंगभूषा सुखदा अहिरे, प्रकाशयोजना संदीप अहिरराव आणि अजय बागडे यांनी केली असून, ध्वनिमुद्रण बॉम्बे बहावा स्टुडिओ, अमळनेर यांचे आहे. देखाव्यात प्रवीण जाधव, सागर चावरिया, रिया अहेर, तेजस चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, गौरव पवार, वैष्णवी पाटील, कोमल पाटील, प्रशांत पाटील, मोहिनी जोशी आणि मयूर बारसकर यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
मंडळाचे अध्यक्ष अमरदीप अमृतकार, उपाध्यक्ष महावीर बाफना आणि हितेश बितराई, सचिव प्रकाश अमृतकार, सहसचिव ध्रुव पारख तसेच सदस्य गौरव पाटील, कपिल दलाल आणि कुशल राणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा देखावा साकारण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. धार्मिक उत्सवासोबतच महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोककला आणि इतिहासाचा ठेवा जपण्याचा प्रयत्न करणारा हा देखावा यंदा अमळनेरकरांसाठी विशेष सांस्कृतिक आकर्षण ठरत आहे.

Leave a Reply