घरापासून दूर असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांची आगारात दिवाळी गोड; चालक-वाहकांना फराळ व उटण्याचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारात लक्ष्मीपूजन आणि अभ्यंगस्नानानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता मुक्कामी असलेल्या चालक-वाहकांना फराळ व उटण्याचे वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. सणानिमित्त घरापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने आगारात हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

अमळनेर आगारात इतर आगारांतून मुक्कामी असलेले चालक-वाहक बांधव आणि भगिनी दिवाळीच्या सणातही प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्यावर होते. त्यांना घरापासून दूर असल्याची उणीव जाणवू नये, यासाठी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पहाटेच फराळ आणि उटण्याचे वाटप केले. यावेळी सर्व चालक-वाहक बंधू-भगिनींना लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. घरापासून दूर राहूनही प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे यावेळी कौतुक करण्यात आले. फराळ वाटपानंतर आगारात दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत या उपक्रमाचा आनंद घेतला. आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *