
अमळनेर–धरणगाव फाटा मार्गाच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी; १७२ कोटींच्या निधीमुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती
आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; लाखो नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनचालकांना मोठा दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडा मार्गावरील गडखांब– पातोंडा–धरणगाव फाटा या उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्गाच्या काँक्रिटीकरणाला शासनाची मंजुरी मिळाली असून, त्यासाठी तब्बल १७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना सुरक्षित, टिकाऊ आणि वेगवान वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या मार्गाच्या उन्नतीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. वाढती वाहतूक, रस्त्याची दुरवस्था आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार अनिल पाटील यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. विविध बैठका, निवेदने आणि प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नांनंतर अखेर निधी मंजूर झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा हा मार्ग उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, शेतमाल वाहतूक करणारी वाहने तसेच प्रवासी वाहतूक सुरू असते. खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. काँक्रिटीकरणामुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. आता धरणगाव फाटा ते अमळनेर या महत्त्वाच्या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे–अमळनेर–चोपडा तसेच धरणगावकडे जाणारा मार्ग अधिक सक्षम होणार आहे. फागणे ते अमळनेर या मार्गाचे रुंदीकरण यापूर्वीच पूर्ण झाले असल्याने धुळेपासून अमळनेरपर्यंतचा रस्ता अधिक मजबूत बनला आहे. त्यात नव्याने मंजूर झालेल्या या काँक्रिटीकरणाची भर पडल्याने संपूर्ण मार्गाची क्षमता वाढणार आहे. यावल, चोपडा, धरणगाव आणि अमळनेर परिसरातील नागरिकांसाठी धुळे शहराशी संपर्क अधिक सुलभ होणार असून, नाशिक, कल्याण आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच अनेक तालुके जलद गतीने एकमेकांशी जोडले जाणार असल्याने व्यापार, उद्योग आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे. सुमारे १७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे. केळी, कापूस, मका, भाजीपाला आणि इतर शेतमालाची वाहतूक जलदगतीने करता येणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. औद्योगिक मालवाहतूक, बांधकाम साहित्याची वाहतूक आणि व्यावसायिक व्यवहार अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे. चांगल्या रस्त्यांमुळे गुंतवणुकीसाठीही पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
काँक्रिट रस्त्यांचे आयुष्य डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अधिक असल्याने वारंवार दुरुस्तीची गरज कमी भासते. त्यामुळे शासनाचा देखभाल खर्चही कमी होतो. पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या निर्माण होत नसल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून वाहनचालकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील रस्ते जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply