अंबरीश टेकडीवरील पाणी शुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायूची गळती; टेकडीवर जाण्यास बंदी, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) अंबरीश महाराज टेकडीवरील शहराच्या पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्रात व्हॉल्व्ह बिघाडामुळे सुमारे ९०० किलो क्लोरीन वायूची गळती झाल्याने रविवारी एकच धावपळ उडाली. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेत टेकडीवर नागरिकांच्या प्रवेशास तात्पुरती बंदी घातली असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहराच्या पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत क्लोरीन वायूचा वापर केला जातो. मात्र क्लोरीन सोडणाऱ्या पाईपचा व्हॉल्व्ह अचानक खराब झाल्याने तो बंद करता आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्लोरीन वायू बाहेर पडून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. वायूमुळे कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन दिनेश बिऱ्हाडे, वाहनचालक फारुख शेख, जफर पठाण, रफिक पठाण, आकाश संदानशीव, आकाश बाविस्कर आणि लखन कंखरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.

क्लोरीन हा अत्यंत तीव्र व विषारी वायू असून त्याच्या संपर्कात आल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, चक्कर येणे, मळमळ, त्वचेची खाज, श्वसन संस्थेवर परिणाम होणे तसेच गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने क्लोरीनचा पाईप पूर्णपणे पाण्यात सोडला असला, तरी मोठ्या प्रमाणातील वायू पूर्णपणे विरघळण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढील किमान ४८ तास परिसरात क्लोरीनचा प्रभाव राहू शकतो. यामुळे २९ जूनच्या सायंकाळपर्यंत अंबरीश टेकडीवर फिरण्यासाठी जाऊ नये तसेच लहान मुलांना तेथे घेऊन जाऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त अंबरीश टेकडी गटातर्फे आयोजित करण्यात आलेला वटवृक्ष रोपणाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *