भूमी सुपोषण चळवळीचा अमळनेरात १९ मार्चला होणार राष्ट्रीय शुभारंभ

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जळगावात झाली विशेष बैठक

 

अमळनेर (प्रतिनिधी) भूमी सुपोषण या चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ १९ मार्च रोजी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मंदिरात भूमिपुत्र श्री मंगळग्रह देवतेची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य शैलीतील विश्वातील एकमेव श्री भूमीमातेची मूर्ती आहे. याच दिवशी श्री भूमीमातेचा वाढदिवस असतो. तसेच हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच देशातील अनेक महनीय व्यक्तींच्या साक्षीने व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. भूमी सुपोषण या चळवळीची एकूणच नितांत आवश्यकता व लोकाभिमुखता लक्षात घेता गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात  कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी पालकमंत्री  गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनन करणवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अबकारी, कृषी अधिकारी, अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांसह अन्य महत्त्वपूर्ण विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह  बाळासाहेब चौधरी, भूमी सुपोषण चळवळीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे बैठकीस उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनाही या बैठकीचे रितसर निमंत्रण होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत १९ मार्चच्या कार्यक्रमाचे एकूणच आयोजन- नियोजन यशस्विता याबाबत सखोल चर्चा झाली. डॉ. महाले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या तयारी व अवाक्याबाबत माहिती दिली. आशिष चौधरी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी सहकार्य केले. मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीतच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीच्या स्पष्ट सूचना दिल्या. नजीकच्या काळात जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत आणखी काही बैठका होतील. तिन्ही मंत्री महोदय यात जातीने लक्ष घालून वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *