
आंतरराष्ट्रीय बालविवाह मुक्त सप्ताह निमित्त बालविवाहमुक्त गावासाठी औरंगपूर येथे जनजागृती मोहीम
महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी )बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असून, बालविवाहाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. याच उद्देशाने अमळनेर तालुक्यातील औरंगपूर येथे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर व जिल्हा महिला बालविकास यांच्या वतीने बालविवाह प्रतिबंधक जनजागृती विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत गावातील महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला तसेच लहान बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी दिवे प्रज्वलित करून बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. महिलांशी व बालकांशी संवाद साधून बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, बालहक्क तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी पालक, महिला, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आशा सेविका आणि संपूर्ण ग्रामसमुदायाने सतर्क राहून जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात बालहक्क सप्ताह आणि बालविवाह प्रतिबंधक जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने विविध स्तरांवर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पोलीस, ग्रामपंचायत, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
या कार्यक्रमाला आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष भारती पाटील, संचालक रेणु प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, तालुका समन्वयक मोहिनी धनगर आणि मुरलीधर बिरारी उपस्थित होते.
बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण, सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, यासाठी बालविवाहमुक्त गाव आणि बालविवाहमुक्त भारत घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Leave a Reply