‘वृक्षारोपण नव्हे, वृक्षसंवर्धन’चा आदर्श; माजी सरपंच महेंद्र पाटील यांचा ५०० झाडे जगविण्याचा संकल्प

अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी स्वखर्चाने तब्बल ५०० झाडे लावून ती जगविण्याचा प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी प्रत्येक रोपाचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पावसाळ्याच्या प्रारंभास गावाबाहेरील मोकळ्या जागेची निवड करून यंत्राच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने मोठे खड्डे खोदण्यात आले. प्रत्येक खड्ड्यात सुपीक काळी माती भरून सुमारे दहा फूट उंचीची विविध प्रजातींची रोपे लावण्यास सुरुवात करण्यात आली. झाडांची वाढ चांगली व्हावी, यासाठी सुरुवातीपासूनच आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

महेंद्र पाटील यांनी केवळ झाडे लावून औपचारिकता पूर्ण न करता प्रत्येक रोपाला नियमित पाणी देणे, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि वेळोवेळी देखभाल करून ती झाडे पूर्णपणे जगविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता ‘वृक्षसंवर्धन’ या संकल्पनेचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.

वाढते तापमान, कमी होत चाललेले हरित क्षेत्र आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकसहभागातून राबविण्यात येणारे उपक्रम काळाची गरज बनले आहेत. महेंद्र पाटील यांच्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचत असून, प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही या उपक्रमातून करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *