
विक्रीला असलेली प्रॉपर्टी आणि डोक्यावरचे कर्ज फेडण्यासाठी अमळनेरकरांनी पालिका ताब्यात दिली काय?
आमदार अनिल पाटील यांचा माजी आमदार शिरीष चौधरी यांना संतप्त आणि खडा सवाल
अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांनी नगरपालिकेत सुरू असलेल्या.मुगल शाहिचा चांगलाच समाचार घेतला असून समाचार घेतला आहे. तुमच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले आहे आणि तुमची प्रॉपर्टी विकायला निघाली आहे. ते कर्ज फेडण्यासाठी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठीच अमळनेरकरांनी पालिका तुमच्या ताब्यात दिली काय? असा खडा सवाल त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना करत आम्ही मंजूर केलेली व पूर्णत्वास येत असलेली विकासकामे केवळ कमिशनसाठी थांबविली जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. तसेच पालिकेच्या एकूण कारभारावर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
आमदार अनिल पाटील यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अमळनेर येथील स्मशानभूमीतील आवश्यकता लक्षात घेता मी नवीन दहन शेड मंजूर करून त्याचे कामही ठेकेदाराने वेगाने सुरू केले. मात्र माजी आमदारांची सत्ता पालिकेत आल्यानंतर त्यांनी ठेकेदारास बिल अदा न केल्याने अंतिम टप्प्यात त्याचे काम थांबविले आहे, त्यामुळे अंत्यविधी बाहेर जमिनीवर होऊन प्रेतांची विटंबना होत आहे. ही सत्ताधारी म्हणून शरमेची बाब आहे. केवळ कमिशनसाठी हे काम थांबविणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा संतापजनक प्रकार आहे. एकतर एकही विकास काम तुम्ही आतापर्यंत आणू शकले नाहीत आणि अनिल भाईदास पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून काम आणले असेल तर ते कमिशनसाठी होऊ द्यायचे नाही, हे खालच्या पातळीवरचे राजकारण अमळनेरकरांचे नुकसान करणारे आहे.
विधानसभेत आवाज उठवणार
मोठ्या अथक प्रयत्नांनी मी 24 बाय 7 नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली तिचे कामही सुरू केले. ते काम देखील कमीशनसाठी यांनी बंद पाडले आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी नवीन रस्ते मी मंजूर केले असता तेथील कामे देखील यांनी कमिशनसाठी थांबवून ठेवली आहेत. पालिका आपल्या ताब्यात आहे, त्यामुळे मर्जी असेल त्याच ठेकेदाराची बिले काढू, अमळनेरकरांच्या जीवावर मोठे कमिशन पदरात पाडून घेऊ आणि त्यातून आपले डोक्यावरील कर्ज फेडू असे मनसुबे माजी आमदारांचे असतील तर त्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. यासंदर्भात विधानसभेत मी आवाज उठविणार असून विकासकामांची व नप फंडातील अत्यावश्यक सेवा पाणीपुरवठा रोजंदारी कर्मचाऱ्यांसह इतर बिले का काढली जात नाहीत याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. म्हणून ती थांबविलेली विकास कामेही लवकरच पुन्हा सुरू होतील असा विश्वास आमदारांनी व्यक्त करत केवळ स्वार्थासाठी आणि कमिशनसाठी विकास कामे थांबविण्याचे उद्योगधंदे बंद करून जनतेचे हाल त्वरित थांबवा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply