कंडारी खुर्द येथे रब्बी ज्वारी शेती शाळा; सुवर्णयुग गटाला विभागीय तृतीय क्रमांक

अमळनेर (प्रतिनिधी) कंडारी खुर्द येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्पाच्या शेती शाळेचा वर्ग उत्साहात पार पडला.

शिवशंभो शेतकरी बचत गटातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत असून लोकेश विष्णू पाटील यांच्या शेतात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. उप कृषी अधिकारी प्रवीण पाटील यांनी रब्बी ज्वारीतील रोग व कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच काढणीनंतरची विक्री प्रक्रिया याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ‘महाविस्तार एआय’ अ‍ॅपचा वापर शेतकऱ्यांनी डिजिटल मित्र म्हणून करून शेती अधिक सक्षम करावी, असे आवाहन त्यांनी केले. तालुका कृषी अधिकारी  ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढवावे, तसेच एकाच पिकावर अवलंबून न राहता कडधान्यांसह विविध पिकांची लागवड करावी, असे मार्गदर्शन केले.

यावेळी खरीप हंगामातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत तूर पिकामध्ये नाविन्यपूर्ण बाबींचा अवलंब व उत्कृष्ट पीक प्रात्यक्षिक सादर केल्याबद्दल सुवर्णयुग शेतकरी बचत गटाने नाशिक विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला. त्याबद्दल गटातील शेतकऱ्यांचे ठाकरे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमास गटाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह  विष्णू पाटील, सुभाष पाटील, जीवन पाटील, राजेंद्र पवार, सुधाकर पाटील, मधुकर पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील तसेच परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी अनिकेत सूर्यवंशी यांनी केले, तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी प्रफुल सोनवणे  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी चेतन चौधरी, नवल वाघ व निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *