
पुराच्या संकटात अमळनेरकरांची माणुसकी; लोकप्रतिनिधींसह तरुण, सामाजिक संस्थानाची युद्धपातळीवर मदत
दोराच्या साहाय्याने नागरिकांची सुटका; वृद्ध महिलांना खांद्यावर व खाटेवरून सुरक्षित स्थळी हलविले

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात अचानक उद्भवलेल्या पुराच्या संकटामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले. काही ठिकाणी नागरिक घरांमध्ये अडकून पडले, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहने अडकली. अशा गंभीर परिस्थितीत आजी-माजी आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, समाजसेवी तरुण, विविध सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, अग्निशमन दल, होमगार्ड, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकारी मदतीसाठी धावून आले. अनेकांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांची सुटका केली. संकटग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासह त्यांच्यासाठी भोजन, पाणी आणि अन्य आवश्यक मदतीचीही व्यवस्था करण्यात आली.
गलवाडे रस्त्यावरील म्हाडा कॉलनीत भिंतीच्या आड असलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील वृद्ध महिला आणि नागरिक अडकून पडले होते. या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी जेसीबी मशीनदेखील पोहोचणे शक्य नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, योगेंद्र बाविस्कर यांच्यासह इतर तरुणांनी धाडसाने दोर बांधून खाली उतरून अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचले. दोराच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यावेळी एका वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून जेसीबी मशीनच्या साहाय्याने पुराच्या पाण्याबाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. फरशी रोडवरील निमाबाई शिरसाठ या महिलेलाही पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. त्यांना चालताही येत नसल्याने त्या घरातच अडकून पडल्या होत्या. ही माहिती प्रवीण संदानशीव यांनी नगरसेवक नावेद शेख यांना दिल्यानंतर मदतीसाठी तातडीने धाव घेण्यात आली. आकाश संदांनशीव, इरफान बेलदार, शाहरुख बागवान, अमीर खान, सतीश बिऱ्हाडे आणि आकाश सोनवणे यांनी घटनास्थळी पोहोचून निमाबाई शिरसाठ यांना खुर्चीवर बसविले. त्यानंतर पाण्यातून त्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. धुळे रस्त्यावरील एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेची झोपडीच पुराच्या पाण्यात बुडाली होती. परिस्थिती अत्यंत बिकट असताना आजूबाजूच्या महिलांनी आणि तरुणांनी धाव घेतली. या वृद्ध महिलेला खाटेसह उचलून पाण्याबाहेर आणत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ढेकू रस्त्यावर नाल्याजवळ पुराच्या प्रवाहात एक चारचाकी वाहन अडकले होते. वाहनातील नागरिकाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच काही तरुणांनी तातडीने धाव घेतली आणि त्याला वाहनातून बाहेर काढले. तसेच वाहतूक पोलीस संजय बोरसे आणि विनय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जेसीबीच्या मदतीने सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. या संकटसमयी माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम,जितेंद्र ठाकूर,मोहन सातपुते,अनिल महाजन, पंकज चौधरी, रवी पाटील, बाळासाहेब संदानशीव, जालिंदर चौधरी, सचिन पाटील, भूषण भदाणे, राजेश पाटील, रवींद्र पाटील, चेतन राजपूत, पंकज शेटे आणि मुख्तार खाटीक यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून नागरिकांना मदत केली. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी परिस्थितीची तातडीने दखल घेत जयनील फौंडेशनला मदतकार्यासाठी पाठविले. जयनील फौंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष वरुण पाटील, सनी गायकवाड, दुर्गेश पाटील, मनीष पाटील, भूषण लोहार, गोविंदा बाविस्कर, दर्शन पाटील, योगीराज पाटील, विवेक निकम, ललित पाटील आणि गौरव महाजन यांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला.
यासोबतच लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, डॉ. मिलिंद नवसारीकर, प्रकाश जैन, मनीष जोशी, राजू नांढा, प्रितेश पारख, दिनेश मणियार, रोनक दोढिवला, राजेश वरलानी आणि संदीप जैन यांनीही पूरग्रस्त नागरिकांपर्यंत आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, रोहित सिंघवी, गोविंद अग्रवाल, सौरभ जैन, रोनक अग्रवाल, सौरभ छाजेड आणि महेश गर्गे तसेच जैन सोशल वर्क यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अन्नपाकिटे, पाणी आणि अन्य आवश्यक मदत पोहोचविण्यात आली. पुराच्या संकटात पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांनीही मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्युत कर्मचारी तसेच अभियंता हेमंत सैंदाणे यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. अचानक आलेल्या पुरामुळे अमळनेर शहरातील नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले असताना, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण, सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रितपणे मदतीचा हात पुढे केला. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांना भोजन व पाणी उपलब्ध करून देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहोचविण्याच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे संकटाच्या काळात अमळनेरकरांची माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली.

Leave a Reply