प्रताप महाविद्यालयात एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहात सुरू; 356 छात्र सैनिकांना सैनिकी शिस्त व नेतृत्वाचे धडे

अमळनेर (प्रतिनिधी )प्रताप महाविद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेरच्या वतीने आयोजित एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहात सुरू असून 20 मे ते 29 मे 2026 या कालावधीत छात्र सैनिकांना सैनिकी शिक्षण, शिस्त, प्रशासन, एकता आणि नेतृत्वाचे धडे दिले जात आहेत. या शिबिरात 48 महाराष्ट्र बटालियन धुळे, 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि 50 महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर या तीन बटालियनमधील छात्र सैनिकांचा सहभाग आहे.

प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तब्बल 356 छात्र सैनिक सहभागी झाले असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सैनिकी प्रशिक्षणासोबत प्रशासन, शिस्त, प्रामाणिक आचरण, श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामूहिक नेतृत्व विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रसेवा, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जात आहे.

शिबिरासाठी प्रताप महाविद्यालयाने छात्र सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था, कवायती व खेळांसाठी पटांगण, वर्गखोल्या तसेच नाट्यगृह उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे प्रशिक्षण शिबिर नियोजनबद्ध आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडत असल्याचे दिसून येत आहे.

शिबिराचे संचालन 49 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव आणि सेकंड ऑफिसर रोहन पाटील यांच्यासह परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

कॅम्पच्या यशस्वितेसाठी प्रताप महाविद्यालयाचे पदाधिकारी, खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी महाविद्यालयाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने छात्र सैनिकांना उत्तम वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची प्रेरणा देणारे हे प्रशिक्षण शिबिर छात्र सैनिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *