सबगव्हाण येथे दोन गटांत लाठ्याकाठ्यांनी हाणामारी ; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सबगव्हाण येथे शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटांत लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील सहाजणांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पहिल्या गटातील रवींद्र शांताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहित मनोहर पाटील, मनोहर रोहिदास पाटील व ललिता मनोहर पाटील यांनी शिवीगाळीच्या कारणावरून त्यांना, त्यांच्या पत्नीला व मुलाला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीला सोडविण्यासाठी गेले असता मनोहर रोहिदास पाटील यांनी हातातील काठीने त्यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तसेच मुलगा निलेश रवींद्र पाटील व सागर रवींद्र पाटील हे सोडविण्यासाठी आले असता रोहित मनोहर पाटील व मनोहर रोहिदास पाटील यांनी त्यांनाही काठ्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५, ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.

तर दुसऱ्या गटातील मनोहर रोहिदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते आई व पत्नीसोबत घराबाहेर बसलेले असताना रवींद्र शांताराम पाटील, निलेश रवींद्र पाटील व सागर रवींद्र पाटील यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. “तू आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात का गेला?” असे म्हणत निलेश व सागर यांनी त्यांचा मुलगा शुभम याला काठीने डोक्यावर व कमरेवर मारहाण करून दुखापत केली. तसेच पत्नी व आईलाही काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणीही मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५, ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *