
बनावट शिक्षक नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी ) मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या कार्यकाळात बनावट कार्यकारिणी दाखवून शिक्षकाची बोगस नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यशवंत किसान माध्यमिक विद्यालय, रत्नपिंप्री (ता. पारोळा) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. एन. पाटील यांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक, विशेष तपास पथक (एसआयटी), शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, एम. एन. पाटील हे १ जानेवारी २०२३ रोजी मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते आणि ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेची कोणतीही कार्यकारी मंडळ अस्तित्वात नव्हती. संस्थेच्या कार्यकारिणीचा वाद धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याने नियमित कार्यकारिणी कार्यरत नसल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. असे असतानाही आपल्या सेवानिवृत्तीनंतर बनावट कार्यकारिणी दाखवून धर्मेंद्र राजेंद्र शिंपी यांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दाखविण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे स्वतःची तसेच शासनाची फसवणूक झाल्याचे एम. एन. पाटील यांनी म्हटले आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर व्ही. बी. भदाणे हे सुमारे एक वर्ष मुख्याध्यापक होते. त्यांच्या कार्यकाळातही धर्मेंद्र राजेंद्र शिंपी हे प्रत्यक्ष सेवेत नव्हते. मात्र, नंतर मागील तारीख दाखवून त्यांची नियुक्ती करण्यात आली. इतकेच नव्हे तर शिक्षण उपसंचालकांच्या अधिकृत शालार्थ यादीतही त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण बनावट आणि खोटे असून शासनाची फसवणूक झाल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी एम. एन. पाटील यांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक, विशेष तपास पथक (एसआयटी), शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीमुळे संबंधित नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता संबंधित यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करून काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply