
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाजहिताची कामे प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन नव्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी अमळनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजहर सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करून नियुक्तीपत्र प्रदान केले.
तसेच एमआयएमचे तालुकाध्यक्ष बबलू शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांची अल्पसंख्याक विभागाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय असलमभाई यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करताना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. लोकहिताची, विकासाभिमुख आणि समाजोपयोगी कामे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, माजी युवक अध्यक्ष इम्रान खाटीक, शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, सरचिटणीस जुनेद शेख, युवक अध्यक्ष दुर्गेश पाटील, अलीम मुजावर तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply