चार दिवसांनंतर ज्वारी खरेदी सुरू; उद्दिष्ट वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून रखडलेली शासकीय ज्वारी खरेदी अखेर सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर असून सुमारे आठशे क्विंटल ज्वारीचीच खरेदी शिल्लक असल्याने अनेक नोंदणीकृत शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मार्केटिंग फेडरेशनतर्फे अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीला शासकीय ज्वारी व मका खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. ज्वारी विक्रीसाठी सुमारे एक हजार तीनशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून शासनाकडून ज्वारीला तीन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार असल्याने बाजारभावापेक्षा अधिक भाव मिळण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. अंतिम मुदतीपर्यंत निर्धारित २१ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता असून एक ते दोन दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. त्यामुळे उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यासाठी उद्दिष्ट वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

नोंदणीतील गोंधळामुळे चार दिवस खरेदी ठप्प

 

शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत लोण येथील शांताराम बाजीराव पाटील आणि जवखेडा येथील डी. जी. पाटील यांनी आधी आमची ज्वारी खरेदी करावी, अशी मागणी केली. नोंदणीच्या क्रमवारीत पुढे-मागे झाल्याचा आरोप झाल्याने वाद निर्माण झाला आणि चार दिवस ज्वारी खरेदी ठप्प राहिली. यामुळे शेतकरी तसेच ज्वारी घेऊन आलेली वाहने खोळंबून राहिली.

दरम्यान, जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुनील मेने यांनी खरेदी केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नोंदणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दोन हजार क्विंटलने खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

अखेर पोलिसांच्या मदतीने ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन क्रमवारीनुसार संदेश प्राप्त झाले आहेत, त्यांना प्राधान्य देत ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी चारशे पंच्याऐंशी क्रमांकापर्यंतच्या शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात आली.

 

चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करू

 

“ज्वारी खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र नोंदणीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येईल. खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.”

— भागवत पाटील, चेअरमन, फ्रुटसेल सोसायटी, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *