
सानेगुरुजी स्मारकासाठी अमूल्य योगदान देऊन सराफ सरांचे स्वप्न पूर्ण करा : अविनाश पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारे प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी पूज्य साने गुरुजी स्मारकासाठी अमूल्य योगदान देऊन प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी हनुमान रिसॉर्ट येथे आदरांजली सभा घेण्यात आली. यावेळी अविनाश पाटील यांनी डॉ. अरविंद सराफ हे पूज्य साने गुरुजींच्या सहवासातील शेवटचे विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले.
सभेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराती वैष्णव समाज, सीनियर सिटीझन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, राष्ट्रसेवा दल, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, खानदेश शिक्षण मंडळ, प्रताप कॉलेज प्राध्यापक संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने डॉ. अरविंद सराफ यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. अरविंद सराफ यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. साने गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि त्यांच्या कर्मभूमीतील स्मारकाच्या कार्याला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. साधेपणातील मोठेपणा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता आणि सामाजिक प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे त्यांनी अमळनेरच्या जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, दर्शना पवार, बजरंगलाल अग्रवाल, अॅड. ललिता पाटील, प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी, प्रा. सुभाष सोमानी, निवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले, महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाशचंद पारेख, मकसूद बोहरी, प्राचार्य व्ही. ए. पाटील, प्रा. वाय. बी. पाटील, राजेंद्र नवसारीकर, भरतसिंग परदेशी, चेतन सोनार आदींनी मनोगत व्यक्त करून डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. अरविंद सराफ यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि साने गुरुजींच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सभेच्या वातावरणात डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. संदीप सराफ, मिलिंद सराफ आणि सराफ कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले, तर आभार गोपाळ नेवे यांनी मानले. साने गुरुजींच्या कर्मभूमीत शिक्षण, समाजसेवा आणि मानवतावादी विचार रुजविणाऱ्या समर्पित व्यक्तिमत्त्वाला अमळनेरकरांनी यावेळी अश्रुपूर्ण नयनांनी भावपूर्ण निरोप दिला.

Leave a Reply