
अमळनेर तालुक्यात जलजीवन मिशनचे काम रखडल्याने सहा ते सात गावांत पाणी टंचाई
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनांची कामे पूर्ण होऊनही निधीअभावी, ठेकेदारांची थकीत बिले आणि वीज जोडणी प्रलंबित असल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सहा ते सात गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतींनी विहीर व बोअरवेल अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले आहेत.
तालुक्यातील गडखांब, धूपी आणि मांजर्डी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने सरपंच नितीन पाटील व ग्रामसेवकांनी भाऊसाहेब लोटन पाटील, विजय हिरामण पाटील व मनोज हिरामण पाटील या शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. धानोरा (भोरटेक) येथेही टंचाई जाणवत असून सरपंच गोपीचंद दौलत यांनी इंद्रसिंग राजपूत यांच्या बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवला आहे. चौबारी येथेही परिस्थिती गंभीर असून सरपंच ए. पी. भिल व ग्रामसेवक वासुदेव मारवडकर यांनी भोरटेक शिवारातील मधुकर पाटील यांच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. जुनोने येथेही टंचाई वाढत असल्याने ग्रामपंचायतीने फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहण प्रस्ताव पाठवले आहेत. दरम्यान, अनेक गावांतील जलजीवन मिशन योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. भोरटेक येथील सोर्स व पंपिंग काम पूर्ण असून वीज जोडणीअभावी योजना सुरू झालेली नाही. धानोरा येथे वितरण लाईन पूर्ण असली तरी पंप हाऊस बाकी आहे. जुनोने योजना पूर्ण आहे, तर चौबारी येथे ८० टक्के काम पूर्ण असून ठेकेदारांचे बिल न मिळाल्याने उर्वरित काम रखडले आहे. गडखांब येथे पंप हाऊसचे कामही अपूर्ण आहे. सहा-सात गावांकडून विहीर व बोअरवेल अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले असून ते ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून जलजीवन मिशनचा केंद्राचा निधी मिळालेला नसून राज्य सरकारचा केवळ २० टक्के निधी मिळाला आहे. निधीअभावी ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता धीरज पाटील यांनी सांगितले. प्रस्तावांची पडताळणी करून विहीर अधिग्रहण मंजुरीसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply