
लेखी आश्वासनानंतर सोमचंद संदानशिव यांचा उपोषणाला तूर्त विराम; आता नगरपरिषदेच्या कृतीची परीक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) : नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बाधित झालेल्या सफाई कामगारांना टाकरखेडा रोडवरील अमळनेर नगरपरिषदेच्या ४६२ सदनिकांमध्ये घरे मिळावीत, शहरातील विविध व्यावसायिक आस्थापनांवर मालमत्ता कर आकारण्यात यावा तसेच गलवाडे रोडवरील ठगू आई रिसॉर्टच्या कथित अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसलेले महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष सोमचंद संदानशिव यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
संघटनेच्या मागण्यांची दखल घेत अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र सोमचंद संदानशिव यांना दिले. या पत्रात संबंधित मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत सोमचंद संदानशिव यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची नगरपरिषदेच्या कृतीची परीक्षा होणार आहे.
सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर आश्वासन
नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बाधित झालेल्या सफाई कामगारांपैकी ज्यांनी नगरपरिषदेच्या घरांसाठी पावत्या फाडल्या आहेत, अशा पात्र कामगारांना टाकरखेडा रोड येथे नगरपरिषदेने बांधलेल्या ४६२ सदनिकांमध्ये घरे मिळावीत, ही प्रमुख मागणी होती. याबाबतचा विषय आगामी सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले आहे. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर पात्र सफाई कामगारांना घरांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
व्यावसायिक आस्थापनांवर मालमत्ता कर आकारणीची प्रक्रिया सुरू
जुनी तंबोली टाकी परिसर, सुभाष चौक भागातील हॉटेल मिडटाऊन येथील दोन मल्टिप्लेक्स थिएटर, एचडीएफसी बँक, मंगल कार्यालये, हॉटेल्स तसेच संबंधित परिसरातील दुकानांना मालमत्ता कर आकारण्यात यावा, अशी मागणी सोमचंद संदानशिव यांनी केली होती. या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाने संबंधित मालमत्तांची अंतिम मूल्यांकन यादी तयार करून ती मूल्यनिर्धारण अधिकारी तथा नगररचना विभाग, जिल्हा जळगाव यांच्याकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पत्रात नमूद केले आहे. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठगू आई रिसॉर्ट प्रकरणात महिनाभरात कारवाईचे संकेत
गलवाडे रोडवरील ठगू आई रिसॉर्टचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा आरोप करत त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. तसेच मुंदडा रो-हाऊसकडे जाणाऱ्या डी.पी. रस्त्यावर पक्क्या भिंती उभारून रस्ता अडवून अतिक्रमण करण्यात आल्याचाही आरोप सोमचंद संदानशिव यांनी केला आहे. या दोन्ही बाबींवर नगरपरिषद प्रशासनाने महिनाभराच्या आत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
स्वातंत्र्य दिनापासून सुरू झाले होते उपोषण
या तिन्ही प्रमुख मागण्यांसाठी सोमचंद संदानशिव यांनी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून लेखी स्वरूपात कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
उपोषणाला पाठिंबा देणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि नागरिक यांचे त्यांनी आभार मानले.
“मागण्यांवरील कार्यवाहीकडे आमचे लक्ष राहणार“
“प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाला मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित करीत आहे. मात्र मागण्यांवरील कार्यवाहीकडे लक्ष राहणार आहे,” अशी भूमिका सोमचंद संदानशिव यांनी व्यक्त केली. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही कितपत आणि किती वेगाने होते, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply