यशवंत आश्रमशाळेची मैदानावर बाजी; दोन रिले संघांसह खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड!

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पिंपळे बु. येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. या यशाच्या जोरावर खेळाडूंची नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्यारसिंग टिंका पावरा याने २०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला, तर सवित सिताराम पावरा याने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय ४ × १०० मीटर आणि ४ × ४०० मीटर रिले या दोन्ही स्पर्धांमध्ये शाळेच्या संघांनी प्रथम क्रमांक मिळवून यशात भर घातली.

रिले संघात प्यारसिंग टिंका पावरा, राजकिरण अमाशा पावरा, सवित सिताराम पावरा, रोहन खुशाल पावरा आणि पवन सायसिंग पावरा यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक स्वप्निल एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर संघ व्यवस्थापक म्हणून राहुल पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.

खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई पाटील, संस्थेचे सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील, संचालक ॲड. अभिजीतदादा पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *