
जळोद डोह तळाला; फक्त सहा दिवसांचा पाणीसाठा शिल्लक, अमळनेरकर नागरिकांचे होणार हाल
नियोजनाच्या अभावामुळे अमळनेरकर त्रस्त, नगराध्यक्षांसह सत्ताधारी सपशेल अपयशी

अमळनेर (प्रतिनिधी) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जळोद डोहात अवघा पाच ते सहा दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच शहरातील अनेक भागांमध्ये आठ ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या नियोजनात नगरपरिषद प्रशासन व नगराध्यक्षसह सत्ताधारी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे.
सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर आल्यानंतर शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात वारंवार दुरुस्ती, नवीन कामे किंवा तांत्रिक अडचणींची कारणे देत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यावर्षी पावसाळा उशिरा होण्याची शक्यता आणि ‘अल निनो’चा धोका कायम असतानाही वेळेत आवर्तन घेण्यात आले नाही. त्यामुळे आता जून महिन्यात आवर्तन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. नदीपात्रात पाणी उपलब्ध असताना आणि राज्यातील सर्वाधिक पाणीपट्टी कर भरणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या अमळनेरमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचा आरोप होत आहे. खाजगी कंत्राटी व्हॉलमनवर नियंत्रण नसल्याचेही बोलले जात आहे. शहरात विविध विकासकामांसाठी खोदकाम सुरू असताना पाणीपुरवठा वाहिन्यांचे वारंवार नुकसान होत आहे. खोदकामावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंते किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून पाणीपुरवठा खंडित होतो. परिणामी नागरिकांना अधिक काळ पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. जळोद येथून ३४० एचपी आणि २७५ एचपी क्षमतेच्या पंपांद्वारे ताशी सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरात पुरविले जाते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा अभियंत्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे दोन पदभार असल्याने ते दररोज उपलब्ध राहत नसल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, नगरपरिषदेकडून पर्यायी स्रोत म्हणून कलाली डोह सुरू करण्याची तयारी दर्शविण्यात येत आहे. मात्र तेथे केवळ ६५ एचपीचे तीन पंप असून त्यांची उपसा क्षमता सुमारे सव्वा लाख लिटर प्रतितास इतकी आहे. त्यामुळे शहराची गरज भागेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या जळोद डोहातील घटता पाणीसाठा, विस्कळीत पाणीपुरवठा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे शहरातील पाणीप्रश्न अधिक गंभीर बनला असून आगामी काही दिवस नगरपरिषदेसाठी कसोटीचे ठरणार आहेत.
दोन दिवसाआड पाणी पुरवठयाचा वादा करणारा दादा कुठे गेला?
“दोन दिवसाआड पाणी पुरवठयाचा वादा करणारा दादा कुठे गेला? दुरुस्ती, नवीन कामाच्या नावाखाली व्हॉल्व्ह बंद केले जातात. अमळनेरची जनता वाऱ्यावर आहे याचीच खंत वाटते. शेवटी निर्णय जनतेचा होता. पाणी उपलब्द असूनही नियोजन नाही. नियंत्रण सुटले आहे वेळप्रसंगी मोर्चा काढावा लागेल.”
– अनिल भाईदास पाटील, आमदार, अमळनेर
नविन ठेकेदार आल्यानंतर परिस्थिती बदलेल
“लेबर कॉन्ट्रॅक्टर जुना आहे, तीनदा ठेका रद्द झाला, आचारसंहितेनंतर नवीन ठेकेदार बदलेल तेव्हा परिस्थिती बदलेल. अभियंता बदलला गेला. अनेकदा व्होल्टेज ब्रेकडाउन होतो. अनेक अडचणी येत आहेत. तापीतील १४ बोअर सुरू आहेत. वेळप्रसंगी आवर्तन घेऊ.”
– डॉ. परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर
समन्वयाचा अभाव हीच मोठी समस्या
“पालिका कर्मचारी, अधिकारी, खाजगी कर्मचारी यांच्यात समन्वय नाही. दोन तीनदा बैठका घेतल्या. व्हॉलमन बदलले तरी गोंधळ कायम आहे. बॉडीने काटकसर करण्यासाठी आवर्तन नाकारले आता जून मध्ये आवर्तन मिळणार नाही. व्हॉलमन किंवा कर्मचारीची खोडसाळपणाची तक्रार आली तर कारवाई करेल.”
– गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

Leave a Reply