चैतन्य राजेंद्र संदानशिव हल्लाप्रकरणी मुख्य आरोपी निकम यास तात्काळ अटकेसाठी समाजबांधवांचा एल्गार

मोर्च्यात घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन

 

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील देवगाव-देवळी येथील स्टोन क्रशरवर काम करणारे चैतन्य राजेंद्र संदानशिव यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अमळनेर शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकातून निघालेल्या या मोर्चात सहभागी झालेल्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्य आरोपी अनंत निकम याच्यासह सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना तसेच अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, चैतन्य राजेंद्र संदानशिव हा कष्ट करून उदरनिर्वाह करणारा सर्वसामान्य युवक असून त्याच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा मित्र कल्पेश पाटील यालाही मारहाण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रकरणाचा निष्पक्ष, जलद आणि सखोल तपास करून भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत लागू असलेल्या सर्व तरतुदींनुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पीडित आणि साक्षीदारांना आवश्यक सुरक्षा, संरक्षण आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

मोर्चादरम्यान उपस्थितांनी “पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने निष्पक्ष व कठोर कारवाई करावी, अशी भूमिका समाजबांधवांनी व्यक्त केली. या मोर्चात माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका शोभाबाई गढरे, देवदत्त संदानशिव, अरुण घोलप, पंचशीला संदानशिव, कल्पना मोरे, दाजीबा गव्हाणे, सनी गायकवाड, तुषार संदानशिव, अरविंद संदानशिव, आकाश संदानशिव, योगेश बिऱ्हाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अनिल ठाकूर, रुहदयनाथ मोरे, राहुल संदानशिव, संदीप गढरे, महेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, जयेश पगारे, विवेक सांगोरे, संदीप वाघ, सचिन ढिवरे, शुभम घोलप, मनीष पाटील, करण साळुंखे, उमेश ढिवरे, संतोष साळवे, गोपीचंद चव्हाण, प्रल्हाद मोरे, सुनील संदानशिव, राजेंद्र संदानशिव, सुधाकर सोनवणे, संजय बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, आकाश गढरे, रमेश झाल्टे यांच्यासह असंख्य समाजबांधव आणि विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *