रोटरी क्लब अमळनेरतर्फे पाण्यासाठी योगदान देणाऱ्या पिंपळे खुर्द येथील महिला शेतकरी गटाचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरती माता महिला शेतकरी गटाचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम श्री दत्ता मंदिर, चिमणपुरी येथे उत्साहात पार पडला.

एकेकाळी पाण्यासाठी झगडणारे व उन्हाळ्यात टँकरसाठी रांगा लागणारे पिंपळे खुर्द गाव आज जलसंपन्नतेकडे वाटचाल करत आहे. हा सकारात्मक बदल पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘धरती माता महिला शेतकरी गटाच्या’ महिलांच्या एकजुटीमुळे शक्य झाला आहे. गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येत महिलांनी लोकवर्गणी, सेवा सहयोग संस्था, मारवाड विकास मंच तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. महिलांनी गावातील नाल्यांची खोली वाढवून सुमारे १३ हजार घनमीटर माती काढली, त्यामुळे अंदाजे १ कोटी ३० लाख लिटर पाणीसाठा निर्माण झाला. तसेच पाझर तलावाचे ७ हजार घनमीटर खोलीकरण करून सुमारे ७० लाख लिटर पाणीसाठा निर्माण करण्यात आला. यामुळे गावातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला आहे. पूर्वी उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय महिलांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘बिहार पॅटर्न’नुसार पाझर तलाव परिसरात सुमारे १,००० झाडांची लागवड केली असून शेताच्या बांधावर फळझाडे लावण्याचेही नियोजन सुरू केले आहे. या प्रसंगी महिला गटातील सदस्यांनी आपल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी यांनी रोटरी संस्थेचे कार्य व समाजोपयोगी प्रकल्पांबाबत माहिती दिली. तसेच प्रोजेक्ट चेअरमन अजय (केले) यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला विजय महेश्वरी,  रोनक संकलेचा, विजय पाटील, रोहित सिंघवी यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

धरती माता महिला शेतकरी गटाच्या महिलांनी केलेल्या या कार्यामुळे गावात जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून महिलांच्या एकजुटीने गावाचे भवितव्य बदलू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे सचिव आशिष चौधरी यांनी केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *