
मेहनत, प्रामाणिकपणा आणि सत्याचा ताळमेळ ठेवा : उपनगराध्यक्ष प्रशांत निकम
अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, फिट इंडिया, योग व ध्यान सत्र तसेच विद्यार्थी लाभाच्या योजनांबाबत विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त सोमवारी आयोजित व्याख्यानासाठी बांधकाम व्यावसायिक तथा अमळनेर नगरीचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांना यशस्वी उद्योजक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अनिता बोरसे होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात अनिता बोरसे यांनी प्रत्येक यशस्वी उद्योजकाच्या मागे मेहनत, श्रम व प्रामाणिकपणाचे गुण असतात. त्यामुळेच त्यांचे नाव यशस्वी उद्योजक म्हणून सन्मानाने घेतले जाते, असे सांगत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यात प्रथम क्रमांक वैष्णवी पवार (८ वी ‘ब’), द्वितीय क्रमांक स्नेहा शिंदे (८ वी ‘अ’), तृतीय क्रमांक भाविका पाटील (८ वी ‘ब’) तर उत्तेजनार्थ हिरल पाटील (८ वी ‘ब’) हिने मिळविला. यावेळी प्रशांत निकम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतेही काम कमी लेखू नका. त्या कामात स्वतःला झोकून देत मेहनत, प्रामाणिकपणा आणि सत्य या तीन गुणांचा ताळमेळ ठेवा. असे केल्यास तुम्ही प्रत्येक व्यवसायात यशस्वी व्हाल. नोकरीच्या मागे न धावता स्वतः मालक व्हा आणि दुसऱ्यांना काम द्या, हीच खऱ्या यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मुकेश पाटील यांनी केले, तर आभार दिलीप पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशमुख, साळुंके, महाजन, सौ. वैद्य, श्रीमती वानखेडे व सौ. वंजारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply