रंजाण्यात पुन्हा बिबट्याची दहशत; पारडूचा फडशा

१५ दिवसांनी पुन्हा दर्शन; आतापर्यंत ५ जनावरांचा बळी, शेतकरी-मजुरांमध्ये भीती

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यात १५ दिवसांनंतर पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. रंजाणे येथे शनिवारी पहाटे शेतकरी अशोक भाऊराव पाटील यांच्या पारडूची बिबट्याने शिकार केली. या घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण असून, तालुक्यात बिबट्याने आतापर्यंत चार जनावरांचा बळी घेतल्याचे समोर आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामांना सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा जनावराची शिकार झाल्याने बिबट्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. रंजाणे येथील अशोक भाऊराव पाटील हे शनिवारी सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना त्यांचे पारडू मृतावस्थेत आढळले. हिंस्र प्राण्याने त्याची शिकार केल्याचे लक्षात येताच त्यांनी सरपंचांसह ग्रामस्थांना माहिती दिली. वनपाल गुलाब पिंजारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. जनावराच्या शरीरावरील जखमा आणि शिकार करण्याच्या पद्धतीवरून हा बिबट्याच असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने शेतकरी काहीसे निर्धास्त झाले होते. शेतातील कामेही सुरू झाली होती. मात्र, रंजाणे येथील घटनेने पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतात जाण्यास मजूर तयार नसल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. आधीच दुष्काळामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीचा आणखी फटका बसत आहे. यापूर्वी हिंगोणे, नंदगाव, अंतुर्ली, रंजाणे, पिंपळे, ढेकू रस्ता, शिरूड, मंगरूळ, गांधली व गडखांब परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. हिंगोणे येथील संतोष शंकर पाटील यांच्या जनावराची तसेच अंतुर्ली येथील उमेश पारधी यांच्या पारडू व गोऱ्हाची बिबट्याने शिकार केली होती. रंजाणे येथील घटनेमुळे आतापर्यंत चार जनावरांचा बिबट्याने बळी घेतल्याचे समोर आले आहे.

 

पिंजरे बदलले, बिबट्या मात्र हाती लागेना

 

बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांकडून वनविभागाला दिली जाते. त्यानंतर पिंजरा लावला जातो. मात्र, बिबट्या जागा बदलत असल्याने दुसऱ्या ठिकाणी दिसल्यानंतर आधीचा पिंजरा काढून तेथे लावला जातो. अशा प्रकारे पिंजऱ्यांची ठिकाणे बदलत असतानाही बिबट्या वनविभागाला हुलकावणी देत आहे. पदमार्क आढळले नाहीत तर बिबट्याच्या अस्तित्वाबाबतही प्रश्न उपस्थित केला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनीही या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

शवविच्छेदनानंतर सोपस्कार

 

वनपाल गुलाब पिंजारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे, सरपंच सचिन पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांच्या उपस्थितीत मृत पारडूचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर सोपस्कार करण्यात आले.

 

रंजाणे शिवारात दोन पिंजरे; बिबट्याच्या हालचालींवर लक्ष

 

“रंजाणे शिवारात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांनी आपली गुरे बंदिस्त करून ठेवावीत. रात्री एकट्याने बाहेर जाण्याऐवजी सोबत कोणाला तरी घेऊन काठी व बॅटरी घेऊन जावे. बिबट्यासाठी पिंजऱ्यात शिकार म्हणून शेळी ठेवली आहे; मात्र बिबट्या अद्याप हाती लागलेला नाही.”

छत्रपती चौव्हान, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *