अमळनेर तालुक्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची एटीएम ते एटीएम भटकंती

जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात संताप; रोखीने  कर्ज वाटपाची मागणी, अन्यथा मोर्चाचा इशारा

 

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांना यंदाही एटीएममधूनच पैसे काढण्याची सक्ती करण्यात येत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा मौल्यवान वेळ एटीएम फिरण्यात जात असून शेती मशागतीची कामेही खोळंबली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मार्च महिन्यात जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व पोटाला चिमटा देत रोखीने पीक कर्जाची परतफेड केली होती. खरीप हंगामापूर्वी पुन्हा कर्जरूपी भांडवल उपलब्ध होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरणा केला. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना आर्थिक व शारीरिक त्रास देणाऱ्या एटीएम पद्धतीनेच कर्ज वितरण सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार जिल्हा बँकेच्या शाखांमधून रोखीने अथवा मायक्रो एटीएमद्वारे कर्ज वाटप करण्याची मागणी केली जाते. मात्र जिल्हा बँकेचे व्यवस्थापन केवळ आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधूनच कर्ज रक्कम काढावी लागेल, अशी अट घालत असल्याचा आरोप होत आहे. सध्या बहुतांश एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शहरभर एटीएम शोधत फिरावे लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून अनेक शेतकरी एटीएम कार्ड घेऊन भटकंती करत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना एटीएम कार्ड हाताळता येत नसल्याने त्यांना सोबत जाणकार व्यक्ती घ्यावी लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा भारही शेतकऱ्यांवर पडत आहे.

 

किसान काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

 

दरम्यान, काँग्रेस नेते प्रा. सुभाष पाटील यांनी जिल्हा बँकेचे एलडीएम सुनील देव्हारा यांची भेट घेत एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याची समस्या मांडली. तसेच शेतकऱ्यांना कर्ज रक्कम रोखीने अथवा जिल्हा बँकेमार्फत थेट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावेळी लवकरच एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा बँकेने तातडीने योग्य तो मार्ग काढला नाही तर किसान काँग्रेसतर्फे बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रा. सुभाष पाटील यांनी दिला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *