भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दहावीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बकरीसाठी औषध घेऊन परतताना हेडावेजवळ अपघात; ढेकू गावावर शोककळा

 

अमळनेर (प्रतिनिधी) औषध घेऊन मोटरसायकलवरून घरी परतणाऱ्या ढेकू येथील दहावीतील विद्यार्थ्याचा भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दिनांक ६ रोजी रात्री हेडावे गावाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ढेकू गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संचित राजेंद्र पाटील (वय १५) हा ढेकू येथील रहिवासी असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. त्यांच्या घरातील बकरीला कुत्र्याने चावा घेतल्याने तिच्यासाठी औषध आणण्यासाठी संचित मोटरसायकल (क्रमांक एमएच-१९-सीव्ही-९३३३ ) वरून अमळनेर येथे आला होता. औषध घेऊन तो परत गावाकडे जात असताना हेडावे गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संचितच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी उदय बोरसे, सुनील पाटील, हेडकॉन्स्टेबल कुमावत व यश सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हेडावे व ढेकू परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *