रूट प्र. डांगरी अभियान’च्या दुसऱ्या वर्षात ५० वृक्षांची लागवड; प्रत्येक रोपट्याच्या संगोपनाची घेतली शपथ

अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीतून रुजविण्याचा निर्धार प्र. डांगरी ग्रामस्थांनी केला. ‘आपल्या मुळांकडे चला, कायापालट घडवा’ या विचाराने प्रेरित ‘रूट प्र. डांगरी अभियान – वर्ष दुसरे’ अंतर्गत रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी गावात भव्य वृक्षदिंडी व वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला.

लोकसहभागातून तब्बल ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामस्थ, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश दुमदुमला. कार्यक्रमाची सुरुवात गावातील बसस्थानकापासून वृक्षदिंडीने झाली. हातात वृक्षांची रोपे घेत ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत गावातून वृक्षदिंडी काढली. या दिंडीचा समारोप जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात झाला. त्यानंतर गावातील विविध ठिकाणी वड, पिंपळ, बकुळ, चिंच, अशोक, लिंब यांसह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षलागवड करून थांबण्याऐवजी लावलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थ व दात्यांच्या लोकसहभागातून वृक्ष तसेच वृक्षसंरक्षक जाळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे ‘झाड लावा, झाड जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला.

कार्यक्रमाला आयकर विभागाचे अधिकारी आणि रूट अभियानाचे प्रेरणास्थान संदीपकुमार रतन साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने प्रेरणा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी गावाच्या विकासात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘एक व्यक्ती–एक वृक्ष आणि एक कुटुंब–एक सामाजिक जबाबदारी’ या भावनेतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ गावागावात व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला. वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य वाढविणारे घटक नसून भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी जीवनाचा आधार आहेत, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्याने स्थापित श्री बिजासनी माता मंदिर परिसरात सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला. रूट प्र. डांगरी अभियानाच्या माध्यमातून वृक्षलागवडीसोबतच गावातील एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रतीची जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीचा कार्यक्रम न राहता ‘लोकसहभागातून हरितक्रांतीकडे वाटचाल’ करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *