परंपरेची बंधने झुगारून खेडी व्यव्हारदळे येथील मुलीने पित्याला दिला मुखाग्नी!

अमळनेर (प्रतिनिधी) समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी प्रथा रूढ आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावात मुलीने पित्याला मुखाग्नी दिला. या घडलेल्या एका घटनेने परंपरेला छेद देत नवा आदर्श निर्माण केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खेडी व्यव्हारदळे येथील रहिवासी अमृत नागो गजरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना एकूण सहा मुली असून मुलगा नव्हता. आयुष्यभर कष्टमय जीवन जगलेल्या अमृत गजरे यांच्या वृद्धापकाळात त्यांची कन्या मंगलाबाई भीमराव मेराळै यांनी त्यांचा सांभाळ केला. वडिलांची सेवा, देखभाल आणि सर्व गरजांची पूर्तता त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे केली होती.

वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला असता, मंगलाबाईंनी स्वतः पुढाकार घेत वडिलांना मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. ‘मुलगा आणि मुलगी समान’ हा विचार त्यांनी कृतीतून साकारत समाजासमोर आदर्श ठेवला. पारंपरिकरीत्या पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या या विधीत एका मुलीने पुढे येत वडिलांचे अंतिम कर्तव्य पार पाडल्याने गावासह अमळनेर तालुक्यात या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे समाजातील जुन्या समजुतींना धक्का बसला असून, मुलीही सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतात, असा ठोस संदेश दिला गेला आहे. अमृत नागो गजरे यांच्या अंत्ययात्रेला गावातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगलाबाईंनी वडिलांना दिलेला अग्निडाग हा केवळ एक धार्मिक विधी नसून पित्याप्रती असलेली कृतज्ञता, प्रेम आणि जबाबदारीची जाणीव असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. या ऐतिहासिक पावलामुळे खेडी व्यव्हारदळे गावाचे नाव पुरोगामी विचारसरणीसाठी ओळखले जाऊ लागले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *