
अमळनेरात विविध मंदिरांत आज हनुमान जयंती उत्सव ; महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील श्री डुबकी मारोती मंदिर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त भव्य जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीतही महाप्रसादाचे भव्य नियोजन करण्यात आले असून, शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री डुबकी मारोती मंदिर येथे पहाटे ५.३० वाजता भगवान हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम श्री डुबकी हनुमान संस्थानतर्फे आयोजित करण्यात आला असून, बजरंगलाल अग्रवाल परिवार व सहकाऱ्यांनी सर्व तयारी केली आहे.
बाजार समितीतही विविध कार्यक्रम
कृषी उत्पन्न बाजार समितीतील मारुती मंदिरावर मोहन कृषी उद्योगचे गोविंद अग्रवाल व रवी ट्रेडिंगचे कपिल कमल दलाल यांच्या विशेष सहकार्याने श्री हनुमान जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन सकाळी ११ वाजेपासून करण्यात आले आहे. महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी बांधव, कर्मचारी व हनुमान भक्तांनी केले आहे.
२२ फुटी हनुमान मंदिरावरही कार्यक्रम
श्री अंबरीश महाराज टेकडीवरील २२ फुटी श्री हनुमान मंदिरावर देखील हनुमान जन्मोत्सव व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाविस्कर परिवार व हनुमान भक्तांनी केले आहे.
विजय मारुती मंदिरात सत्यनारायण महापूजा
अमळनेर शहरातील श्री विजय मारुती मंदिर येथे आज (दि. २ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता हनुमान जन्मोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत उपाध्ये व परिवाराने केले आहे.

Leave a Reply