
स्कॉलरशिप परीक्षेत साने गुरुजी विद्यालयाचा मयूर पाटील राज्य गुणवत्ता यादीत, बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात अव्वल कामगिरीची नोंद केली आहे. विद्यालयाच्या इयत्ता आठवीतील तब्बल बारा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली असून, मयूर गजानन पाटील याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
यापूर्वीही विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत सोळा विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दिले होते. त्यानंतर आता स्कॉलरशिप परीक्षेतील या यशामुळे संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत मयूर गजानन पाटील याने चमकदार कामगिरी केली. तसेच मोहक साळुंखे, विराज पाटील, तपन पाटील, पार्थ पाटील, जयेश चौधरी, मोहित पाटील, हिमांशू मराठे, पियुष शिंदे, युगंधर पाटील, शिवम पाटील आणि सागर साळुंखे यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली.
शासनाच्या नियमानुसार या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशानिमित्त विद्यालयात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील आणि प्राचार्य एस. जे. शेख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने तपन पाटील आणि मयूर गजानन पाटील, पालक प्रतिनिधी म्हणून गजानन पाटील, तर संचालक प्रतिनिधी म्हणून प्राचार्य एस. जे. शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशामुळे साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply