अमळनेरात एलसीबीचा छापा; गोवंश कत्तलीवर कारवाई, ११ जण ताब्यात, ६ फरार

अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शुक्रवारी पहाटे अमळनेर शहरातील पारधीवाडा व जपान जिन परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या दोन ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सहा संशयित घटनास्थळावरून फरार झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आले असून तीन जिवंत बैलांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी ६ ते दुपारी १२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी पारधीवाडा व जपान जिन परिसरातील दोन ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान हसनखान गुलाबखान पठाण (वय ६५), मोहसीनखान हसनखान पठाण (वय ३५), फराजखान हमीदखान कुरेशी (वय २०), अर्षदखान अजीजखान कुरेशी (वय ४८), रियाज अहमद अब्दुल शकूर कुरेशी (वय ५५), तन्वीर शेख ताहेर कुरेशी (वय ४१), जावेदखान सुलेमानखान कुरेशी (वय ५०), अब्दुल शेख नुरा कुरेशी (वय ५०), अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी (वय ५६) आणि शरीफ शेख अकबर कुरेशी (वय २५) यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, इकबाल शेख आहत शेख कुरेशी, जहांगीर शेख साबीर शेख कुरेशी, आरीफ अजीज कुरेशी, जाबीरखान अब्बासखान कुरेशी, जहीरखान जाबीरखान कुरेशी आणि शरीफखान मजीदखान कुरेशी हे सहा संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान विविध वयोगटातील गोवंशाचे सुमारे १ हजार ५७५ किलो मांस जप्त करण्यात आले. त्याची अंदाजित किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे. तसेच चार लोखंडी कुऱ्हाडी, नऊ लोखंडी सुऱ्या, सहा कोयते, दोन वजनकाटे व इतर साहित्य असा ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याशिवाय जपान जिन परिसरातील पत्र्याच्या शेडमधून १२ ते १६ वर्षे वयोगटातील तीन पांढरे गावरान बैल जिवंत अवस्थेत आढळून आले. त्यांची सुटका करून सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले. या जनावरांची अंदाजित किंमत १ लाख ५५ हजार रुपये असून जप्त मुद्देमाल व जनावरांची एकूण किंमत ४ लाख ७३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईनंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांच्या उपस्थितीत गोवंशाच्या मांसाचे रासायनिक विश्लेषणासाठी नमुने सीलबंद करण्यात आले. उर्वरित मांस अमळनेर नगर परिषदेच्या मदतीने पंचांसमक्ष खड्डा खोदून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *