चारचाकीत टाकून अज्ञातांनी भर चौकातून गाय नेली चोरून

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक परिसरातून भर पहाटे एका गायीची धक्कादायक पद्धतीने चोरी झाल्याची घटना घडली आहे. दोन अज्ञात इसमांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून येत गायीला काहीतरी खाऊ घातले आणि काही क्षणांत तिला वाहनात टाकून पसार झाल्याची घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शहरातील पशुपालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ जुलै रोजी पहाटे २.३१ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून राणी लक्ष्मीबाई चौकात आले. त्यांनी तेथे असलेल्या गायीला काहीतरी खाद्यपदार्थ देऊन तिला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर गायीला जबरदस्तीने वाहनात टाकून ते घटनास्थळावरून पसार झाले.

चोरीस गेलेली गाय समाधान संतोष पाटील यांची असून ते सुभाष चौक परिसरात पाववडा विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळी गाय दिसून न आल्याने शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गायीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेमुळे शहरात भटक्या तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच चोरीस गेलेली गाय तातडीने शोधून मालकाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून संबंधित वाहन आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *