
भुसावळ–सुरत एक्सप्रेसमध्ये नवजात शिशू बेवारस; पालकांचा शोध घेणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस जाहीर
अमळनेर (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवासादरम्यान बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या नवजात शिशूच्या पालकांचा शोध घेण्यासाठी अमळनेर रेल्वे पोलिसांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली असून, संबंधित महिला किंवा शिशूच्या पालकांबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि. ९ मे २०२५ रोजी गाडी क्रमांक १९००८ भुसावळ–सुरत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात अंदाजे एक महिन्याचे नवजात शिशू बेवारस अवस्थेत आढळून आले होते. धरणगाव ते अमळनेर दरम्यान अज्ञात व्यक्तीने हे शिशू रेल्वेगाडीत सोडून दिल्याचा संशय असून, या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे, नंदुरबार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२५ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ९४ अंतर्गत तपास सुरू आहे.
तपासादरम्यान या प्रकरणाशी संबंधित एका अनोळखी महिलेचा शोध घेतला जात आहे. सदर महिलेचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या महिलेबाबत किंवा नवजात शिशूच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यास बक्षीस, ओळख राहणार गोपनीय या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नागरिकांची मदत महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उपयुक्त माहिती देणाऱ्या व्यक्तीस १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. संपर्कासाठी रेल्वे पोलीस ठाणे, नंदुरबार, प्रभारी अधिकारी : राहुल त्र्यंबक शेजवळ मोबाईल : ७०३०४४७००७ / ८७८८१५७८५८ आहे. तर या बेवारस नवजात शिशूच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply