
हजारो किलोमीटरचा प्रवास; मंगळग्रह मंदिरात दुर्गाज्योतींचे भक्तिभावात स्वागत!
अमळनेर (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवासाठी देशातील विविध देवीस्थानांवरून अखंड ज्योत आणण्याची श्रद्धापूर्ण परंपरा जपत दुर्गा मित्र मंडळांचे भक्त हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास करीत आहेत. या अखंड ज्योती श्री मंगळग्रह मंदिरात आणून प्रथम मंगळग्रह देवाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यंदाही विविध मंडळांच्या दुर्गाज्योतींचे मंदिरात भक्तिभावात स्वागत करण्यात आले. विधिवत पूजा-अर्चा आणि देवदर्शनानंतर या ज्योती संबंधित गावांकडे रवाना झाल्या.
यामध्ये नवदुर्गा मित्र मंडळ, कापूसवाडी, जामनेर; जय बजरंग ग्रुप, उमाळा, जळगाव; तसेच महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर या मंडळांच्या भक्तांचा सहभाग होता. मंडळांच्या माहितीनुसार, काही भक्तांनी पावागड, सावरियाशेठ आणि तनोट माता मंदिरासह विविध देवीस्थानांशी संबंधित मार्गांवरून ज्योत आणण्याचा संकल्प पूर्ण केला. काही भक्तांनी परतीच्या प्रवासात शहादा, नेरी आदी मार्गांचा वापर करून आपल्या गावाकडे प्रस्थान केले.
महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर या मंडळाच्या भक्तांनी सुमारे १ हजार २५० किलोमीटरचा प्रवास करून अखंड ज्योत आणली. प्रवासादरम्यान ज्योत अखंड तेवत राहावी, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. काही युवक भक्त अनवाणी पायांनी धावत ज्योत घेऊन येतात. श्रद्धा, निष्ठा आणि सामूहिक सेवाभावाचे दर्शन घडविणारी ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत
अमळनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाज्योतींचे स्वागत केले. त्यानंतर कचेरी रोडवरील शांतीभूषण ट्रेडर्स, पतंजली वितरक व आरोग्य केंद्र येथे आशिष भाऊ चौधरी यांच्या वतीने ज्योतींची विधिवत पूजा करण्यात आली. प्रवास करून आलेल्या भक्तांसाठी विश्रांती, चहा-नाश्ता आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर भक्त ज्योतींसह श्री मंगळग्रह मंदिराकडे रवाना झाले.
मंगळग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण
श्री मंगळग्रह मंदिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, विविध विश्वस्त आणि मंगळग्रह सेवेकरी यांच्या उपस्थितीत अखंड ज्योतींचे स्वागत करण्यात आले. मंदिरात ज्योतींची विधिवत पूजा-अर्चा करून त्या मंगळग्रह देवाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या. त्यानंतर भक्तांनी देवदर्शन घेऊन मंदिर परिसरात प्रदक्षिणा केली. या ज्योती रात्रभर मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा व आरती करून पुढील प्रवासासाठी त्यांना निरोप देण्यात आला.
मंदिराच्या वतीने आलेल्या भक्तांच्या निवासाची, महाप्रसादाची आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली.
नवरात्रोत्सवात अखंड ज्योतींना विशेष महत्त्व
गावात अखंड ज्योत पोहोचल्यानंतर तिचे स्वागत करून नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत पूजन केले जाते. घटस्थापना, देवीपूजन, उपवास आणि विविध धार्मिक विधींच्या माध्यमातून गावागावांत भक्तिमय वातावरण निर्माण होते. हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास करून देवीमातेची ज्योत आपल्या गावात आणणाऱ्या भक्तांच्या श्रद्धा आणि सेवाभावाचे श्री मंगळग्रह मंदिराच्या विश्वस्त मंडळाने कौतुक केले. धार्मिक परंपरा, परस्पर सहकार्य आणि भक्तिभाव जपणारा हा उपक्रम नवरात्रोत्सवात विशेष महत्त्व प्राप्त करतो.

Leave a Reply