कृष्ण जन्माष्टमीच्या जल्लोषात विद्यार्थ्यांचा उत्साह; शिक्षक दिनालाही मिळाला संस्कारांचा रंग

अमळनेर (प्रतिनिधी) : शहर व तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली तसेच शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम झाले.

 

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल

 

दुर्गा फाउंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन आणि गोकुळ जन्माष्टमी संयुक्तपणे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे करण्यात आले. कै. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी पोशाख, आकर्षक मुकुट, बासरी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे शाळेचा परिसर कृष्णमय झाला होता. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्ण नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून उत्सवाची रंगत वाढवली.

कृष्ण जन्माष्टमीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची ओळख बालवयातच व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रेम, मैत्री, आनंद, सदाचार आणि सत्याचा मार्ग यांसारख्या भगवान श्रीकृष्णांच्या जीवनमूल्यांचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. भक्तिगीते, कृष्णनामाचा जयघोष आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी शाळेचे चेअरमन उत्कर्ष वामनराव पवार, सचिव अलका पवार, उपाध्यक्ष उमाकांत पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

 

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल

 

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मदर तेरेसा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत अध्यापनाचा अनुभव घेतला. शिक्षकाचे आत्मसमर्पण, कर्तव्यभावना आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान याबाबत सौ. एस. एस. देसले यांनी मनोगत व्यक्त केले. मदर तेरेसा यांच्या समाजोपयोगी कार्याची माहिती शिक्षक प्रशांत वंजारी आणि सौ. व्ही. डी. पाटील यांनी मनोगतातून दिली. शाळेत शिक्षक दिनाच्या एक दिवस आधी गोकुळ जन्माष्टमीचा उत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. ‘आला रे आला, गोविंदा आला’च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराती, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका कुमारी मीनाक्षी बारी, व्हि. पि. बडवे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, व्ही. जी. बोरवले, वृषाली बोरसे, विद्या कुळकर्णी, स्वाती साळुंखे, अनंत बागल, विनायक सूर्यवंशी, रोहन मुंदडा तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने शाळेच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय जल्लोष आणि शिक्षक दिनाचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *