
भरकटलेला युवा वर्गाला दिसत योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज : खासदार ॲड. उज्ज्वल निकम
अमळनेर (प्रतिनिधी) : “समाजाचे आपण काही देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीतून रोटरीचे कार्य जगभर सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. रोटरीकडून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसह विविध सेवाकार्ये केली जातात. मात्र, आजचा युवा वर्ग भरकटलेला दिसत असून, त्याला योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज आहे. हे काम रोटरीने हाती घ्यावे,” असे प्रतिपादन पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ दि. २० ऑगस्ट रोजी नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटे. ॲड. रुपेश पाटील आणि रोटे. गनी मेमन, जळगाव यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी परिवारातील सदस्य तसेच साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक माजी प्राचार्य अरविंद सराफ यांच्यासह सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष रोटे. देवेंद्र कोठारी यांनी गतवर्षातील कार्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांना कॉलर, रोटरी चार्टर व हॅमर प्रदान करून पदभार सोपविला. मावळते सचिव रोटे. आशिष चौधरी यांनी सचिवपदाचा पदभार रोटे. प्रशांत निकम यांच्याकडे सोपविला. नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. असिस्टंट गव्हर्नर ॲड. रुपेश पाटील यांनी आरआय डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा संदेश वाचून दाखविला. प्रमुख पाहुणे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रोटे. मकसूद बोहरी यांनी संपादित केलेल्या ‘सेवाचक्र’ या रोटरी बुलेटिनचे विमोचन करण्यात आले. खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. रोटरी रक्तदान, आरोग्य तपासणी यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहे. मात्र, युवा पिढीसमोर आज विविध आव्हाने उभी आहेत. अनेकदा युवा वर्ग दिशाहीन किंवा भरकटलेला दिसतो. अशा युवकांना योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची गरज असून, रोटरीने या क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन आणि रोटरी ॲनी. आरती रेजा यांनी केले. आभार प्रदर्शन रोटे. प्रशांत निकम यांनी केले. रोटरी ॲनी. पूर्वा वशिष्ठ यांनी पसायदान सादर केले.
या प्रसंगी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, सौ. ज्योती निकम, धरणगाव, पारोळा, चोपडा येथील रोटरी पदाधिकारी, लायन्स क्लब, अमळनेर वकील संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, श्री मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, खाशी मंडळाच्या माधुरीताई पाटील, नीरज अग्रवाल, मनोहर निकम, ॲड. विलास वाणी, ॲड. मनोहर पवार, ॲड. तीलोत्तमा पाटील, सौ. भारती सोनवणे यांच्यासह शहरातील मान्यवर, व्यापारी, रोटरी परिवार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी इन्क्लेव्हसाठी निवड
आरआय डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये रोटरी इन्क्लेव्ह म्हणून रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सेक्रेटरी, तर रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा यांची जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. या दोघांचाही सत्कार प्रमुख पाहुणे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
“मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी घ्यावी”
रोटे. गनी मेमन यांनी वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. वृद्धाश्रमांसाठी सध्या तीन ते पाच वर्षांची प्रतीक्षा यादी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. “मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी घेणे ही काळाची गरज आहे,” असे रोटे. गनी मेमन म्हणाले.

Leave a Reply