
अमळनेरमध्ये ४७ गणेश मंडळांचे निर्धारित वेळेत विसर्जन; शिस्तबद्ध मिरवणुकीत मंडळांचा श्री सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) अनंत चतुर्दशीला अमळनेर शहरात ४७ गणेश मंडळांचे उत्साहात, मात्र प्रथमच निर्धारित वेळेत विसर्जन करण्यात आले. शांततेत, वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांना अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, मुंदडा बिल्डर्स, नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, व्हॉइस ऑफ मीडिया, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने श्री सन्मानाने गौरविण्यात आले.
जयअंबे तरुण कुढापा मंडळाची देशभक्ती गीतांवर मिरवणूक
२५ रोजी सकाळपासून गणेश मंडळांनी विसर्जनाची तयारी सुरू केली होती. काही मंडळांनी दुपारीच गुलालविरहित आदर्श मिरवणूक काढली. जय अंबे तरुण कुढापा मित्र मंडळाने देशभक्तीपर गीते वाजवत, महिलांनी हातात पेटत्या मेणबत्त्या धरून शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्व. अजित पवार, स्वामी विवेकानंद, भगतसिंग आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा घेऊन मिरवणूक काढली.
दरवर्षी उशिरा विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या पानखिडकी येथील जयबजरंग गणेश मंडळ आणि भोईवाड्याचा राजा पवनपुत्र गणेश मंडळाने यावर्षी वेळेत विसर्जन मिरवणूक काढून आदर्श निर्माण केला. गुलाल, पताके, डी.जे., बँड आणि ताशांच्या आवाजात विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या. सिद्धिविनायक, शिवशक्ती, त्रिमूर्ती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगलमूर्ती, जयबजरंग, पवनपुत्र, माऊलीचा गणराज, महावितरण, अमर, भावसार, मच्छी मार्केट, मुंदडा इस्टेट, वक्रतुंड, एकता गणेश मंडळ, प्रताप मिलचाळ, प्रताप कुमार व्यायामशाळा, न्यू प्लॉट यांच्यासह मोठ्या मंडळांचे विसर्जन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांचा सन्मान
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, मुंदडा बिल्डर्स, नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, व्हॉइस ऑफ मीडिया, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आमदार अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील हिंगोणे, सरपंच राजश्री पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती नावेद शेख, मुख्याधिकारी गणेश शिंदे, मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, योगेश मुंदडा, छोटू जैन, प्रदीप अग्रवाल, अध्यक्ष विनोद अग्रवाल, मुरली बितराई, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रताप साळी, नरेंद्र संदानशिव, नरेंद्र चौधरी, विजय कहारू पाटील आणि पंकज साळी यांच्या हस्ते मंडळांचा सन्मान करण्यात आला.
तसेच नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, अग्निशमन दल, होमगार्ड पथक, पोलीस विभाग तसेच कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नपाकिटे पुरवणाऱ्या शेखर राजपूत, महेश संकलेचा आणि रोनक संकलेचा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अचानक आग; पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत
सराफ बाजारात मिरवणुकांची गर्दी असताना अचानक फटाक्यांची ठिणगी पडून एका घरावरील गवताला आग लागली. त्याचवेळी सराफ बाजारात तसेच दगडी दरवाजात मोठी गर्दी झाली होती. दरवाजात डी.जे.ची गाडी अचानक मागे सरकल्याने पोलीस कर्मचारी उज्वल म्हस्के याचा पाय अडकून त्याचा बॉल सरकला. त्यामुळे गाडी मागे-पुढे करता येत नव्हती आणि अग्निशमन दलालाही सराफ बाजारात जाता येत नव्हते.
मात्र पोलीस कर्मचारी आणि सराफ बाजारातील नागरिकांनी धावपळ करत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.

Leave a Reply